शेतकर्यांच्या समृद्धीसाठी नैसर्गिक शेती वरदान

ओरोस : सिंधुदुर्ग जिल्हा कृषि प्रतिष्ठान द्वारे सुभाष पाळेकर नैसर्गिक कृषि आंबा, काजू, नारळ व भाजीपाला परिषद आयोजित करण्यात आली. परिषदेच्या दुसर्‍या दिवशी प्रशिक्षणार्थीना मार्गदर्शन करण्यात आले. कृषि प्रतिष्ठानचे अध्यक्ष ब्रिगे. सुधीर सावंत यांनी उपस्थित सर्व प्रशिक्षणार्थीना नैसर्गिक शेतीमधून तयार होणार्‍या विषमुक्त अन्न निर्मितीच्या चळवळी मध्ये भाग घेण्याचे आवाहन केले व कृषि प्रतिष्ठान द्वारे शेतकर्‍यांना सर्वोतपरी मदत करण्यात येईल असे म्हणाले.

विषमुक्त अन्न मिळणे हा प्रत्येक मानवाचा मूलभूत अधिकार आहे. आपल्या देशाला विषमुक्त अन्नाची प्रचंड गरज आहे. खर्‍या अर्थाने शेतकर्‍यांचे जीवन आनंदी व समृद्ध करावयाचे असेल तर नैसर्गिक शेतीची आवश्यकता आहे असे ते म्हणाले. या तंत्रज्ञानाची माहिती शेतकर्‍यांना कृषि प्रतिष्ठान द्वारे सतत उपलब्ध केली जाईल.

येत्या १२ नोव्हेंबर पासून शेतकर्‍यांसाठी दोन दिवस, आठ दिवस व सहा महीने कालावधीचे सुभाष पाळेकर नैसर्गिक शेतीची प्रक्षिक्षण वर्ग सुरू करण्यात येणात आहेत त्याचा लाभ शेतकर्‍यांनी घ्यावा असे आवाहन केले. सुदृढ आयुष्यासाठी पुन्हा आपल्या निसर्गाकडे वळावे लागेल तरच आपली गावे स्वयंपूर्ण होतील असे ते म्हणाले.

नैसर्गिक शेतीचे तज्ञ पद्मश्री डॉ. सुभाष पाळेकर यांनी शेतकर्‍यांना दोन दिवसामध्ये सखोल मार्गदर्शन केले. घनजीवामृत, जीवामृत, आच्छादन, आंतरपिके, लागवडीच्या पद्धती, अन्नद्रव्य व्यवस्थापन, नैसर्गिक पद्धतीची कीटक नाशके या विषयी मार्गदर्शन केले. दुपारच्या सत्रामध्ये गीर गाईचे पूजन करण्यात आले. नैसर्गिक शेती करणार्‍या शेतकर्‍यांचा सन्मान करण्यात आला. ग्रामीण कृषि कार्यानुभवाच्या मोंड गावातील विद्यार्थ्यांचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. शिबिरामध्ये सिंधुदुर्ग, कोल्हापूर, गोवा येथून ९०० शेतकरी सहभागी झाले होते.

माजी आमदार पुष्पसेन सावंत, सचिव दीनानाथ वेरणेकर, संचालिका सुनीता राणे, सौ. सुप्रिया निकम, तुषार देसाई, डॉ. मंदार गीते, प्रा. आशीष पाटील उपस्थित होते.

दीनानाथ वेरणेकर, सचिव सिंधुदुर्ग जिल्हा कृषि प्रतिष्ठान