नैसर्गिक आंबा काजू परिषद

सिंधुदुर्ग जिल्हा कृषि प्रतिष्ठान, किर्लोस समृध्द किसान बनविण्यासाठी मोहिम राबवित आहे. यामध्ये शेतकरिता राज्यस्तरीय सिंधु अँग्रो फेस्ट व भव्य कृषि प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात समृध्द किसान ह्या कार्यक्रमाची सुरूवात पद्मभुषण डॉ. विजय भटकर यांच्या हस्ते करण्यात आली. कोकणात प्रथमच नैसर्गिक आंबा व काजू परिषदेचे राज्यस्तरीय आयोजन २४ व २५ मे २०१७ रोजी स. ९.00 ते सायं. ७.00 वा. या वेळेत शरद कृषि भवन , ओरोस येथे आयोजित करण्यात आले आहे. शुन्य खर्च नैसर्गिक शेतीचे अभ्यासक कृषि क्रषि पद्मश्री सुभाष पाळेकर यांचे दोन दिवस खास मार्गदर्शन लाभणार आहे. आंबा उत्पादक शेतकरी, व्यापारी, प्रक्रिया उद्योजक, शेतकरी वर्ग, विस्तार कार्यकर्ते, शास्त्रज्ञ यांना या परिषदेचा मोठा लाभ होणार आहे.

शेतकऱ्यांचे उत्पादन वाढविण्यापेक्षा त्यांचे निव्वळ उत्पन्न वाढविणे ही काळाची गरज ओळखून कृषि प्रतिष्ठान आणि सावंत पटेल सिंधुदुर्ग फार्मर्स प्रोड्युसर्स कंपनीच्या सहयोगाने या राज्यस्तरीय परिषदेचे आयोजन केले आहे. परिषदेत सहभाग घेण्यासाठी नाव नोंदणी छत्रपती शिवाजी कृषि महाविद्यालय, ओरोस येथे चालू आहे.

दिवसें दिवस रासायनिक खतांचा होणारा वापर व त्यावरील अफाट खर्च कमी करण्यासाठी नैसर्गिक शेती हा सक्षम पर्याय शेतकऱ्यांसाठी देण्यात येणार आहे. या परिषदेचा कोकणातील शेतकर्‍यांनी मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.