नैसर्गिक शेती प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन

प्रत्येक नागरिकाचे जीवन आनंदी व समृद्ध बनविणे हे प्रतिष्ठानचे ध्येय आहे. पौष्टिक, सकस व शाश्वत अन्न निर्मिती ही आजची काळाची गरज आहे. नैसर्गिक शेतीचे तज्ञ डॉ. सुभाष पाळेकर यांचे नैसर्गिक शेतीचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्याकरिता कृषि प्रतिष्ठानद्वारे नैसर्गिक शेती प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन सिंधुदुर्गचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री तथा पालकमंत्री मा. उदय सामंत यांच्या शुभहस्ते करण्यात आले. ओरोस येथील कृषि महाविद्यालयाच्या प्रक्षेत्रावर भेट देऊन नैसर्गिक शेतीची पाहणी करून समाधान व्यक्त केले. नैसर्गिक शेती प्रशिक्षण केंद्राच्या फलकाचे अनावरण पालकमंत्री यांचे हस्ते करण्यात आले. सोबत आ. वैभव नाईक, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, अतिरिक्त जिल्हाधिकारी मंगेश जोशी, सतीश सावंत, संदेश पारकर, कृषि प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष माजी खा. ब्रिगे सुधीर सावंत, कर्नल नरेश कुमार उपस्थित होते. प्रक्षेत्रावर मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. नैसर्गिक शेतीचा मुख्य घटक जीवामृत याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले.

यावेळी पालकमंत्री मा. उदय सामंत यांनी मार्गदर्शन केले. नैसर्गिक शेतीच्या उपक्रमाला सर्वतोपरी शासन स्तरावर मदत करण्यात येईल, असे आश्वासन पालकमंत्री यांनी दिले. ब्रिगे. सुधीर सावंत यांनी उभारलेला नैसर्गिक शेतीचा उपक्रम स्तुत्य व शेतकरी हिताचा आहे. शेतकरी स्वत:च्या पायावर उभा राहण्यासाठी नैसर्गिक शेती महत्वाची आहे. त्यातून मोठ्या प्रमाणात उत्कृष्ट अन्नाची निर्मिती होऊ शकते. या जिल्ह्यात पर्यटन विकासाला मोठा वाव आहे. हा जिल्हा शैक्षणिकदृष्ट्या पुढे जाणे गरजेचे आहे. सुधीर सावंत यांनी आंबा महोत्सव सुरू करून शेतकऱ्यांना आंबा विक्रीसाठी एक नवीन मार्केट उभे केले. रासायनिक शेती करण्यापेक्षा मोठ्या प्रमाणात नैसर्गिक शेती करावी असे आवाहन यावेळी उपस्थितांना त्यांनी केले.

ब्रिगे. सुधीर सावंत म्हणाले, या देशातील वाढत्या अन्न उत्पादनाची गरज फक्त नैसर्गिक शेतीद्वारेच भागवता येईल. कारण रासायनिक शेतीमुळे जमिनी नापीक होते आणि त्यातून विषारी अन्न निर्माण होते. ज्यामुळे भारताच्या जनतेचे आरोग्य धोक्यात आले आहे. डायबेटीस, कॅन्सर, हृदयविकार, रक्‍तदाब इत्यादी आजार प्रचंड प्रमाणात वाढले आहेत. कुपोषण आपल्या महिला आणि मुलांमध्ये भेडसावत आहे. म्हणून आम्ही पूर्ण देशात ही चळवळ उभारली आहे. त्यात कोकण आघाडीवर असले पाहिजे. केंद्र सरकारने व राज्य सरकारने यांना मंजूरी देऊन शेतकऱ्यांना एक आशा दिलेली आहे. तरी पालकमंत्री, जिल्हाधिकारी व आमदारांनी या चळवळीला ऊर्जित अवस्थेत आणावे.

यावेळी आ. वैभव नाईक, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, कर्नल नरेश कुमार, संदेश पारकर,माजी आ. पुष्पसेन सावंत, अतिरिक्त जिल्हाधिकारी मंगेश जोशी, जिल्हा कृषि अधीक्षक डॉ. चांगदेव बागल, नागेंद्र परब, जान्हवी सावंत, अतुल रावराणे तसेच संस्थेचे उपाध्यक्ष प्रदीप सावंत, सचिव दिनानाथ वेर्णेकर, संचालक सुशांत नाईक, आबा मुंज, बाबू रावराणे, कृषीमित्र तुषार देसाई, नीलम दळवी, उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दीनानाथ वेरणेकर यांनी केले तर आभार डॉ. मंदार गीते यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. विलास सावंत, देवेंद्र शेवडे, मेघराज डिक्सित यांनी केले. या कार्यक्रमास कृषि विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. मंदार गीते, प्राचार्य आशीष पाटील, आनंद सावंत, कृषि विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ, महाविद्यालयाचे प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.