कुक्कुटपालनातून आत्मनिर्भरतेकडे

कुक्कुटपालन विशेषत: परसबागेतील हे कृषि विज्ञान केंद्र सिंधुदुर्ग मार्फत गावागावात पोहचविले गेले. आज ही सिंधुदुर्गात सुमारे 200 युनिटस ही परसबाग कुक्कुटपालनाची युनिट्स म्हणून सरासरी 250 ते 400 कोंबड्यांच्या माध्यमातून यशस्वीरीत्या सुरू आहेत. कृषि सलग्न व्यवसाय म्हणून शेतकरी, महिलाबचत गट यांना सरासरी अंदाजे रु.४०,००० ते ५५,००० वार्षिक उत्पन्न हा उद्योग मिळवून देतो. तसेच शेतकरी कुटुंबाची सकस आहाराची गरजही पूर्ण करतो.

कोविड- 19 च्या वातावरणात,अनेक व्यवसाय मागे पडत असताना बंद होत असताना, बेरोजगारीचे सावट वाढत असताना सिंधुदुर्ग चे माजी जिल्हा परिषद अध्यकाश व कृषि विषयी विशेष आस्था असणारे श्री. संग्रामजी प्रभुगावकर यांनी डॉ. मंदार गीते व कृषि विज्ञान केंद्र सिंधुदुर्ग शी संपर्क साधला. आणि याच पुढाकारातून सविस्तर, कौशल्य आधारित प्रशिक्षणाचे नियोजन साकारले.

मसुरे गावात दि. 15 जुलै ते 17 जुलै 2020 या कलावधीत परसबागेतील कुक्कुटपालन विषयावरील प्रशिक्षण अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने व ग्रामस्थांच्या उत्तम सहभाग – सहकार्याने संपन्न झाले.
प्रशिक्षणाच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना मा. संग्राम प्रभुगावकर यांनी सिंधुदुर्गची भौगोलिक रचना, विभागवार शेती पद्धती शासनामार्फत चालविण्यात येणार्‍या प्रमुख योजना, शेतीचे नियोजन, कोविड पश्चचात ग्रामीण शेतकरी व युवक- युवती यांचे साथी गावातच रोजगाराची गरज या विषयी उत्तम सविस्तर मार्गदर्शन केले.

डॉ. मंदार गीते, वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख , कृषि विज्ञान केंद्र, सिंधुदुर्ग यांनी आपल्या मार्गदर्शनात कृषि विज्ञान केंद्राचे कार्य, विविध उपक्रम, कुक्कुटपालनाचे शेती विषयातील अर्थकारण, भूमिका सांगून सिंधुदुर्गची अंडी व कोंबडीच्या मांसाची मागणी व पुरवठा याकडे प्रशिक्षणार्थीचे लक्ष वेधले. कोंबड्यांच्या केंद्रामार्फत प्रसार करण्यात आलेल्या विविध जाती विषयी ही थोडक्यात माहिती दिली. तसेच जिल्ह्याच्या गरजेनुसार कोंबडी उत्पादनात वाढ करण्यासाठी सर्वांनी पुढाकाराने या व्यवसायाला मदत केली पाहिजे व यात सुधारित जातींचा वापर वाढविला पाहिजे,असे सांगितले.

कृषि विज्ञान केंद्राचे पशुवैद्यकीय तज्ञ डॉ. केशव देसाई यांनी या प्रशिक्षणाला प्रमुख तांत्रिक मार्गदर्शन केले. तीन दिवस आपल्या शास्त्रीय शैलीत पण सोप्या भाषेत मार्गदर्शन करताना त्यांनी कोंबड्यांच्या जाती, अंडी- मांस साठीच्या जाती, ग्रामप्रिया, हितकरी, गिरीराज, वनराज, कडकनाथ, काला- पिला असिल, गावठी कोंबडी पालन, कोंबड्यांच्या जागेचे नियोजन व व्यवस्थापन, लहान पिल्लांची घ्यावयाची काळजी, लसीकरण- रोगनिदान व उपाय, कोंबड्यांसाठी आवश्यक जागा, खाद्य व्यवस्थापन, खाद्यात अझोलाचा वापर, कोंबड्यांसाठी हवा- पाण्याचे नियोजन, कोंबडीच्या चोचीचे संस्कार, त्यांचे पोषण – पालनाचे संगोपनाचे प्रकार, अंडी व मांसाचे बाजारभाव व विक्री व्यवस्था या विषयी माहिती दिली. विस्तार तज्ञ डॉ. विलास सावंत यांनी हा व्यवसाय कशा प्रकारे वाढवायचा व यातील खाचखळगे याविषयी मार्गदर्शन केले. तसेच कृषि विस्तार कार्याचे महत्व सांगून, प्रशिक्षण पश्चात शेतकर्‍यांच्या प्रतिक्रिया घेतल्या.

प्रशिक्षण आयोजन ही क्रिएटिव्ह युथ फोरम मसुरे व कृषि विज्ञान केंद्र सिंधुदुर्ग, ग्रामपंचायत मसुरे यांच्या माध्यमातून झाले. ग्रामपंचायत सरपंच संदीप हडकर, सदस्य जगदीश चव्हाण, जयवंत परब, पत्रकार झुंजार पेडणेकर .. यांनी प्रशिक्षण यशस्वी करण्याकरिता विशेष परिश्रम घेतले व सॅनिटायझर, मास्क, सोशल डिस्टन्सिंग, दूरस्थ उष्णता मापक यांचा वापर श्री. संग्राम प्रभुगावकर व त्यांचे सर्व सहकारी यांच्या काटेकोर नियोजनाखाली करण्यात आला.

सदर प्रशिक्षणात ७२ ग्रामस्थ, शेतकरी युवक, युवतींनी उत्सुर्फ प्रतिसाद नोंदविला. व आपल्या शंकाचे निरसन करून घेतले. कृषि विज्ञान केंद्रामार्फत या प्रशिक्षणार्थीना मागोवा घेण्यासाठी whatspp group ची स्थापना करण्याच्या सूचना डॉ. मंदार गीते यांचेमार्फत देण्यात आल्या.