समृद्ध गाव निर्मितीतून आनंदी जीवन

दि. १४.२.२०२० रोजी पोखरण येथे “समृद्ध गाव ” या विषयावर मेळावा आयोजित करण्यात आला. यावेळी अध्यक्षपदावरून बोलताना सिंधुदुर्ग जिल्हा कृषि प्रतिष्ठानचे अध्यक्ष व “समृद्ध गाव” या संकल्पनेचे प्रणेते ब्रिगे. सुधीर सावंत यांनी उपस्थित शेतकरी महिला व युवक यांना आवाहन केले की आपण सर्वांनी मिळून गाव समृद्ध करूया व आपले जीवन आनंदी करूया.

यावेळी बोलताना ब्रिगे. सुधीर सावंत यांनी “समृद्ध गाव” तयार करणे हाच आपला दृष्टिक्षेप आहे असे संगितले यासाठी पहिल्यांदाच पोखरण, कुसबे व कुंदे या गावांची निवड करण्यात आली आहे. ते म्हणाले की समृद्ध गावाचा पाया असा आहे की गावातला प्रत्येक माणूस हा आनंदी व समृद्ध झाला पाहिजे. त्यासाठी रोजगार, कृषि व कृषि आधारित उद्योग या माध्यमातून गावातील लोकांचे आर्थिक उत्पन्न वाढविणे, गावातील प्रत्येकी व्यक्तीचे आहार, खेळ, व्यायाम, योग या माध्यमातून आरोग्य सुधारणे तसेच विविध कला, हस्तकला, संगीत या माध्यमातून जीवन अधिक समृद्ध व आनंदी करणे. तसेच शेती, फलोद्यान, प्रक्रिया उद्योग, दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन, शेळीपालन याचबरोबर दैनंदिन गरजेच्या वस्तु निर्मिती उद्योग, नैसर्गिक शेती, कला व सांस्कृतिक चळवळ, योग, क्रीडा, आरोग्य, शेतमाल विक्री व्यवस्था, शिक्षण इ. सर्व माध्यमातून गाव स्वयंपूर्ण व समृद्ध करायचा आहे. यासाठी राज्य व केंद्र शासनाच्या योजना, लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था यांची मदत घेण्यात येणार आहे.

आमदार वैभव नाईक यांनी मार्गदर्शनात संगितले की ब्रिगे. सुधीर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली व पुढाकाराने सुरू करण्यात येत असलेल्या “समृद्ध गाव” योजनेला माझे पूर्ण सहकार्य राहील. तसेच गावातील पाणी प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे संगितले. यावेळी श्री. चंद्रकांत सदडेकर यांनी शेतमालाला बाजारपेठ उपलब्ध करण्यासाठी तसेच विक्री व्यवस्थेविषयी मार्गदर्शन केले. कुंदे सरपंच श्री. सचिन कदम यांनी मनोगत व्यक्त केले.

कृषि विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ श्री. भास्कर काजरेकर यांनी प्रस्तावनेत “समृद्ध गाव” या विषयांची संकल्पना विषद केली. कृषि अधिकारी श्री. हडकर यांनी मार्गदर्शन केले. प्राचार्य श्री. आनंद सावंत, शास्त्रज्ञ सौ. सरिता बेळणेकर, डॉ. देसाई यांनी सुद्धा तांत्रिक मार्गदर्शन केले. प्रा. कु. पावसकर यांनी सूत्रसंचालन केले, तर शास्त्रज्ञ श्री. बाळकृष्ण गावडे यांनी आभार मानले.

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून कुडाळ- मालवण चे आमदार श्री. वैभव नाईक हे होते. तसेच या कार्यक्रमाला मुंबईस्थित उद्योजक श्री. चंद्रकांत सदडेकर , कुंदे गावाचे सरपंच श्री. सचिन कदम पोखरण गावाचे उपसरपंच श्री. संदीप बागवे, कृषि विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ, तसेच छ्त्रपती शिवाजी कृषि महाविद्यालयाचे प्राध्यापक उपस्थित होते. कार्यक्रमाला पोखरण, कुसबे, कुंदे गावातील बहुसंख्य महिला शेतकरी, शाळेतील शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पोखरण चे श्री. एस. के. सावंत यांनी विशेष परिश्रम घेतले.